प्रादेशिक पक्ष मिळून केंद्रात सरकार स्थापन करतील
कोलकता – लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये भाजपला खातेही उघडता येणार नाही. तो पक्ष 100 जागांचा आकडाही पार करू शकणार नाही. त्यामुळे केंद्रात भाजप पुन्हा सत्तेवर येणार नाही, असे भाकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी केले.
दार्जिलिंग लोकसभा मतदारसंघात झालेल्या सभेत ममता बोलत होत्या. प्रादेशिक पक्षांचे महत्व वाढले आहे. त्यांच्या समवेत तृणमूल केंद्रात सरकार स्थापन करेल. नव्या सरकारच्या स्थापनेत बंगाल सर्वांत महत्वाची भूमिका निभावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजकीय हेतूंसाठी सशस्त्र दलांचा वापर करण्याबाबत लष्कराच्या निवृत्त अधिकाऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली आहे. त्याचा संदर्भ देत ममतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. मोदींप्रमाणे मी निवडणुकांत जवानांच्या नावावरून मते मागणार नाही, असे त्यांनी म्हटले. मोदींवर आणखी टीका करताना त्या म्हणाल्या, चौकीदार खोटारडा आहे. देशात 12 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, मोदी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे खोटे आश्वासन देत आहेत. परदेशांतून काळा पैसा परत आणून नागरिकांच्या बॅंक खात्यांमध्ये 15 लाख रूपये जमा करण्याचे आश्वासनही मोदींनी पाळले नाही. मात्र, मी जे आश्वासन देते; ते पूर्ण करते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.