पुणे – शहरात गेल्या 24 तासांत करोनाचे नवीन 246 बाधित सापडले असून, आजचा बाधित दर 4.19 टक्के इतका आहे. वाढती गर्दी, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा आणि करोना नियमाकडे दुर्लक्ष केल्यास बाधित संख्या पुन्हा वाढण्याची भीती आहे.
पुण्यातील दिवसभरात 351 जण करोनामुक्त झाले असून, 21 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामध्ये पुणे शहर हद्दीतील 10 तर अन्य भागातील 11 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 8 हजार 92 जणांचा मृत्युची नोंद झाली आहे.
मागील आठवड्यात शहरातील बाधित दर 3 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. मात्र, आज हा बाधित दर 4 टक्क्यांच्या पुढे असून, तो 5 टक्क्यांच्या पुढे गेला, तर शहरात पुन्हा कठोर निर्बंध लावण्यात येतील, असे उपमुख्यमंत्र्यांकडून यापूर्वीच सांगण्यात आले आहे.
त्यामुळे हा दर पाच टक्क्यांच्या आत ठेवण्याची जबाबदारी आता पुणेकरांवर आहे. शहरात सक्रीय बाधित संख्या 2 हजार 773 इतकी असून, त्यातील 483 जणांची प्रकृती चिंताजनक आहे तर 736 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आले आहे, असे आरोग्य विभागाने सांगितले.