पुणे – महानगरपालिकेची जून महिन्यात होणारी सर्वसाधारण सभा (जीबी) आता ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. महापालिकेच्या जुन्या तसेच नवीन इमारतीतील सभागृहात यापुढील काळात या सभा घेतल्या जाणार आहेत. दोन्ही सभागृहांत 50 टक्के उपस्थितीच्या नियमाचे पालन करत सर्वसाधारण सभा होणार आहेत, अशी माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने गेल्या काही महिन्यांपासून पालिकेच्या सर्वसाधारण सभा प्रत्यक्ष उपस्थित राहून घेण्याबाबत राज्य सरकारने निर्बंध घातले होते. त्यामुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेतली जात होती. या सभांमध्ये अनेक तांत्रिक अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे सभासदांनी या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.
भाजपसह विरोधी पक्ष कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, मनसे या पक्षांच्या सभासदांचा यात समावेश होता. ऑनलाइन सभा घेताना अनेकदा इंटरनेट डिसकनेक्ट होत असल्याने अडचणी येत होत्या. इच्छा असूनही सभासदांना आपले मत, भूमिका मांडताना अडथळे येत होते. त्यामुळे सर्वसाधारण सभा ऑफलाइन पद्धतीने घ्यावी, अशी मागणी सभासदांकडून केली जात होती.
करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्य सरकारने निर्बंध हटवण्यास सुरुवात केली आहे. यानंतर सर्वसाधारण सभा ऑफलाइन घेण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मनपाच्या सर्वपक्षीय गटनेत्यांनी केली होती. याबाबत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. त्यावेळी पवार यांनी “सर्वसाधारण सभा घेण्याबाबत अशी परवानगी द्यावी,’ अशा सूचना नगरविकास विभाग अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानुसार गेल्या आठवड्यात पालिकेला ही परवानगी देण्यात आली आहे.