‘जय श्री राम’च्या घोषणा नाही तर ‘तावीज’वरुन मारहाण; वृद्धाच्या मारहाण प्रकरणाला दिला धार्मिक रंग

पोलिसांनी Twitter सहीत ९ जणांविरोधात दाखल केला दंगलीचा गुन्हा

लखनऊ: गाजियाबादमध्ये लोणी बॉर्डरवर अब्दुल समद या व्यक्तीला झालेल्या मारहाण आणि दाढी कापण्याच्या प्रकरणाला धार्मिक रंग दिल्याचे पोलिसांच्या चौकशीतून उघड झाले आहे.गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणात  9 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यात ट्विटरच्या  अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. लोणी बॉर्डर ठाण्यात पोलिसांनी FIR दाखल करून घेतली आहे.

गाजियाबादमध्ये एका मुस्लीम व्यक्तीला मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलिसांचे असं म्हणणं आहे, की या वृद्धाने दिलेली सर्व माहिती चुकीची होती. या व्यक्तीने  अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली होती, मात्र हा व्यक्ती या लोकांना ओळखत होता. सोबतच इथे कोणालाही घोषणा देण्यासाठी बळजबरी करण्यात आलेली नव्हती.

पोलीस तपासात,  हा वृद्ध व्यक्ती 5 जून रोजी बुलंदशहरहून बेहटा म्हणजेच लोणी बॉर्डर येथे आला होता. तिथून ते एका व्यक्तीसोबत मुख्य आरोपी परवेश गुज्जरच्या बंथला येथील घरी गेले. परवेशच्या घरी काही वेळातच कल्लू, पोली, आरिफ, आदिल आणि मुशाहिद ही इतर लोकंही जमा झाली आणि मारहाणीला सुरुवात केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, अब्दुल समद तावीज बनवण्याचे काम करतात. मात्र, त्यांनी दिलेल्या तावीजमुळे या युवकांच्या घरी उलट परिणाम पाहायला मिळाला, त्यामुळे त्यांनी हे कृत्य केले.

अब्दुल समद, परवेश, आदिल, कल्लू हे आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते. कारण, अब्दुल समद यांनी गावातील अनेक लोकांना तावीज दिले होते. याप्रकरणी मुख्य आरोपी परवेश याला याआधीच अटक करण्यात आली आहे. तर, कल्लू आणि आदिल यांना 14 जून रोजी अटक झाली आहे. इतर आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याप्रकरणी ट्विट केले होते. यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशची बदनामी करू नये, असे निर्देश दिले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.