पुणे -पुणे विभागातील मार्चमध्ये मान्यता दिलेल्या रस्त्यांची मेअखेर किंवा जूनच्या काम सुरू करा, अशा शब्दांत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या.
विभागातील 24 हजार 107 किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जिओ फेंसिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे या रस्त्यांवर खड्डा पडल्याची तक्रार आल्यास त्याची संबंधित अभियंत्यावर जबाबदारी निश्चित असेल. त्या रस्त्यांच्या दर्जावर ऑनलाइन निरीक्षण केले जाईल, अशी माहिती चव्हाण यांनी दिली. पुणे विभागात 14 इमारती मंजूर असून त्यांची सुमारे 74 कोटींची किंमत आहे. त्यासाठी 28 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यात सध्या कामगार आयुक्तालयाच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे. पुढील वर्षी मार्चपर्यंत काम संपविण्याचे उद्दिष्ट आहे. साडेपाच एकर जागेत कृषी भवन उभारण्यात येणार असून नऊ मजली कार्यालयांसह चार मजली पार्किंग असेल. शिवाजीनगर येथील विस्तारीत न्यायालयाची इमारतीसाठी 97 कोटींचा खर्च प्रस्तावित आहे, अशी माहिती बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
“पीएमआरडीए’सोबत सामंजस्य करार
येरवडा येथे 21 एकर जागेत सेंट्रल बिल्डिंग, सहकार भवन, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सहकार भवन उभारण्यात येणार आहे. तसेच तेथील बांधकाम विभागाची 11 एकर जागा “पीएमआरडीए’ला देण्यात आली असून त्याबदल्यात ते कर्मचाऱ्यांसाठी 250 निवासस्थाने बांधणार आहेत, अशी माहिती पुणे विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.