पुणे – मी इथला भाई आहे. इथे रिक्षा लावायची नाही म्हणून एकाने त्याच्या साथीदारासह रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली. यावेळी भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या एकावर लोखंडी पालघणने वार करण्यात आले. त्याच्या हातावर छोटीशी शस्त्रक्रीया करावी लागली, याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किरण गोविंद गोरे (वय २७) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, साहील गणेश वायदंडे (वय २४) हा पसार झाला आहे. याप्रकरणी शब्बीर बाबू शेख (वय ४९, रा. घोरपडी पेठ) यांनी फिर्याद दिली. घटनेत शेख यांच्यासह अन्य एकजण जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. २९ ) सायंकाळी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हे रिक्षाचालक असून वायदंडे पथारी व्यावसायिक आहे. तो पान टपरी चालवितो. गुरुवारी वायदंडे याच्याकडून चुन्याच्या बाटलीतील काही चुना शेख यांच्या मुलाच्या अंगावर उडला गेला. त्यामुळे शेख यांनी वायदंडेला जाब विचारला. त्याचा राग आल्याने वायदंडेने त्याचा मित्र किरण गोरेला बोलावून फिर्यादीला बेदम मारहाण केली. मी इथला भाई आहे. याठिकाणी रिक्षा लावायची नाही, असे म्हणून शिवीगाळ केली.
यावेळी भांडणे सोडविण्यासाठी मध्ये आलेल्या एकाला देखील आरोपींनी लोखंडी पालघणने मारहाण केली. यात दोघेही जखमी झाले आहेत. घटनेनंतर आरोपींनी हवेत पालघण फिरवून दहशत मजविली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यातील आरोपी गोरे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. गोरे हा सराईत गुन्हेगार आहे. तर, वायदंडे याचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे करीत आहेत.