पाथर्डी : तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तारकेश्वर गडावरील दानपेटी फोडून चोरटयांनी सहा लाख रुपयांची रोकड लंपास करण्याची घटना घडून एक महिना लोटला तरीही या घटनेतील आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना अपयश आले आहे. असे असताना दुसरीकडे या घटनेतील एका संशयित आरोपीने थेट गडावर येत गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांनाच दमदाटी केल्याने भाविकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या महिन्याच्या सहा तारखेच्या रात्री गडावर संस्थापक नारायण महाराज यांच्या समाधी मंदिरात असलेली दानपेटी चोरटयांनी उचलून नेत त्यातील रोकड लंपास केली. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी आदिनाथ महाराज शास्त्री हे आळंदीला होते. या घटनेच्या संदर्भात शास्त्री यांच्या गाडीचे चालक अशोक दहिफळे यांनी बीड जिल्ह्यातील अमळनेर पोलीस स्टेशनला १२ हजार रुपये चोरीस गेल्याची फिर्याद दाखल केली. चोरटयांनी जी दानपेटी पळवून नेली होती, ती दानपेटी दुसऱ्या दिवशी गडाच्या पायथ्याला आढळून आली.
शास्त्री यांचे दर्शन घेऊन जे भाविक देणगी द्यायचे ती देणगी शास्त्री हे या दानपेटीत टाकत असल्याने दानपेटीत मोठी रक्कम जमा होत होती. तीन दिवसांपूर्वी शास्त्री हे या घटनेतील फिर्यादी दहिफळे, वृद्धेश्वरचे संचालक उद्धव वाघ व वैभव आंधळे यांना घेऊन अमळनेर पोलीस स्टेशनला गेले.
दहिफळे यांच्या पुरवणी जबाबात त्यांनी या दानपेटीत सहा लाख रुपयांची रोकड असल्याचे नमूद केल्याने सहा लाख रुपयांची चोरी झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. दहिफळे यांनी ही चोरी ज्या पाच संशयितांनी केली, त्यांची नावे पोलिसांना दिली. यातील एक संशयित हा शास्त्री यांच्या दररोजच्या कार्यक्रमांची डायरीतील पानांची फोटो काढण्याचे काम करत असायचा. ज्या संशयितांची नावे पोलिसांना दिली त्यातील एकाही आरोपीला अद्यापपर्यंत पोलिसांनी अटक केली नसून एक संशयित सोमनाथ सांगळे हा एक मार्चला गडावर आला. त्याने माझे नाव का घेतले, असे म्हणत शास्त्री यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याने भाविकांमध्ये संतापाची लाट उमटली. या घटनेतील आरोपींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी भाविकांमधून होत आहे .
ज्यांची संशयित म्हणून नावे घातली आहेत, त्यातील तीनजणांची चौकशी केली आहे. अद्यापपर्यंत ठोस पुरावे हाती न लागल्याने आरोपींना अटक केली नसली तरी आमचा तपास योग्य दिशेने चालू आहे. लवकरच आरोपींना अटक करू.
-भार्गव सपकाळ,सहायक पोलीस निरीक्षक, अमळनेर पोलीस स्टेशन