पुणे – फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील वैशाली हॉटेलसह अन्य व्यवहारांचे कुलमुखत्यारपत्र करण्यासाठी पत्नीवर दबाव टाकल्याप्रकरणातील पती विश्वजीत विनायकराव जाधव याचा जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला. त्याने, अॅड. पुष्कर दुर्गे यांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने विविध अटी शर्तींवर तो मंजूर करत जाधव यास जामीन दिला.
याबाबत, 34 वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 6 डिसेंबर 2021 रोजी घोले रस्ता येथील घरी असताना सासु, सासरे, दिर व नवरा यांनी कुलमुखत्यारपत्रासाठी दबाव आणल्याचे फिर्यादित नमूद आहे. याप्रकरणात, जाधव याच्या वतीने अॅड. दुर्गे यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना संपूर्ण एफ. आय. आर. खोटी व बनावट आहे. बंदुकीचा धाक दाखवून पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न केला अशी घटना घडली नाही.
ज्या दिवशी घटना घडली तेव्हा तिथे जाधव उपस्थित नव्हता याचा पुरावा अर्जदाराच्या वकिलांनी कोर्टात दाखल केला. तसेच घटना घडली त्या ठिकाणी बंदुकीची गोळी हवेत झाडल्याचा कोणताही पुरावा नाही. बंदुकीच्या गोळ्या झाडल्याच्या खुणा घटना घडली त्या ठिकाणी नसल्याचे सांगत एफआयरआरमधील प्रत्येक आरोपीसाठीचा कागदोपत्री पुरावा सादर केला.
याखेरीज, अर्जदाराने एफआयआरमधील प्रत्येक आरोप कागदोपत्री पुराव्याने खोडून काढले आहेत. तक्रार दार हीने अर्जदार वर बरेच गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान, इतर गुन्ह्यात अर्जदाराला जामीन मिळाला आहे. एफआयआर 18 महिन्याच्या फरकाने दिली आहे. अर्जदार यांना आधी अंतरिम संरक्षण दिले होते त्यातील अटी अर्जदार याने पाळल्या आहेत तसेच यापुढे तपासा साठी पोलीस कोठडी ची गरज नसल्याचा युक्तिवाद अॅड. दुर्गे यांनी केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरत जामीन दिला.