रायपूर –छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 223 उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी 46 उमेदवार मालमत्तेचा विचार करता करोडपती आहेत. त्यातील खडगराज सिंह हे आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार सर्वांत श्रीमंत आहेत.
छत्तीसगढमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. त्यातील 20 जागांसाठी पहिल्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. त्या टप्प्यात नशीब आजमावणाऱ्या उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांची छाननी असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि छत्तीसगढ इलेक्शन वॉच या संस्थांनी केली. संबंधित संस्थांनी उमेदवारांच्या मालमत्तेविषयीचा अहवाल जारी केला.
त्यानुसार, आपचे सिंह 40 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्तेचे धनी आहेत. ते पूर्वाश्रमीच्या राजघराण्यातील सदस्य आहेत. सर्वांत श्रीमंत उमेदवारांच्या यादीत दुसऱ्या स्थानी भाजपच्या भावना बोहरा आहेत. त्यांच्याकडे 33 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. सर्वांत गरीब उमेदवार ठरलेल्या हेमकुमार सतनामी यांच्याकडे केवळ 8 हजार रुपयांची मालमत्ता आहे.
ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. उमेदवारांच्या सरासरी मालमत्तेत भाजप सर्वांत वरच्या स्थानी आहे. त्या पक्षाच्या 20 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 5.33 कोटी रुपये आहे. त्याखालोखाल कॉंग्रेसच्या 20 उमेदवारांची सरासरी मालमत्ता 5.27 कोटी रुपये इतकी आहे.