पुणे – पुणे जिल्हा किसान क्रेडिट कार्ड म्हणजे पीक कर्ज वाटपामध्ये सलग तिसऱ्या वर्षी उच्चांक गाठला आहे. सन २०२३-२४ मध्ये गतवर्षी ३१ डिसेंबरपर्यंतच एकूण ५ हजार ७६३ कोटी रुपये इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झालेले आहे.
गत आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण ५ हजार २० कोटी रुपये आणि त्यापूर्वी २०२१-२२ मध्ये ३ हजार ८९३ कोटी इतके पीक कर्ज वाटप जिल्ह्यात झाले होते. तत्पूर्वी २०१५-१६ साली ३ हजार ५०६ कोटी ३१ लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. यावर्षीच्या ५ हजार ५०० कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टापेक्षा २६३ कोटी रुपये अधिक कर्ज वाटप करून उद्दिष्टाच्या १०५ टक्के कामगिरी केली आहे. यामध्ये मत्स्यव्यवसायासाठी २ कोटी २ लाख रुपये तसेच पशुपालनासाठी १७ कोटी ७६ लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला आहे.
फेब्रुवारी आणि मार्चची आकडेवारी समोर आल्यावर यात आणखी मोठी भर पडणार आहे. या व्यतिरिक्त कृषी मुदत कर्ज वाटपामध्येही ६ हजार ६ कोटी हजार रुपये कर्ज वाटप झाले असून पीक कर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ११ हजार ७६९ कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे.