पुणे – दाट धुके, ढग दाटून आलेले आणि शहरासह उपनगरात सकाळपासूनच पावसाला सुरवात झाली. काही भागात भुरभुर तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. त्यामुळे दिवसभर शहरातील डोंगरभाग असलेल्या परिसरात धुके पसरले होते तर पावसाची रिपरिप सुरू होती. मगरपट्टा परिसरात सर्वाधिक १३ मिमी पावसाची नोंद झाली. तर शहराच्या मध्यवर्ती भागात 3 मिमी पावसाची नोंद झाली.
वाढलेली आद्र्ता, चक्रीवादळाची स्थिती आणि हवामानातील सतत बदल होत असल्याने पुणे शहरासह कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. विदर्भात काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. मंगळवारी (दि. ९) सकाळपासूनच पावसाने हजेरी लावल्यामुळे ऐन थंडीचा पाऊस अशी परिस्थिती होती.
नवीन वर्षाच्या दुसऱ्र्याच आठवड्यात पावसाच्या आगमनाने वातावरणात बदल झाला असून, दिवसभर धुके आणि ढगाळ वातावरण आहे. दरम्यान, शहरात पुढील २४ तासात काही भागात हलक्या किंवा अती हलक्या पावसाच्या सरी पडतील. त्यानंतर ढगाळ वातावरण कमी झाल्याने आकाश हळूहळू निरभ्र होईल. तर किमान व कमाल तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.त्यामुळे पुन्हा थंडीचा जोर वाढणार आहे.
शहरातील काही भागात झालेला पाऊस
शिवाजीनगर ३ ,पाषाण ४, लोहगाव ५, चिंचवड ७, लवळे ५, मगरपट्टा १३