पुणे – यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे, तसेच शहरात पूर्वमोसमी पावसाने अनेकदा मोठ्या दुर्घटना घडत असल्याने महापालिका प्रशासनाने आपत्कालीन स्थितीत महामेट्रोची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
महामेट्रोचे शहरात काम सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात कामगार उपलब्ध आहेत, तसेच महामेट्रोची स्वतंत्र क्युआरटी टीमही कार्यरत आहेत. या यंत्रणेची मदत शहरात आपत्कालीन स्थितीत घेतली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख गणेश सोनूने यांनी दिली.
शहरातील पावसाळी आपत्ती व्यवस्थापनाबाबत महापालिका आयुक्तांनी नुकतीच बैठक घेतली होती. या बैठकीत, हा निर्णय घेण्यात आला असून, महामेट्रोला त्याबाबत पत्र देण्यात आल्याचेही सोनुने यांनी स्पष्ट केले. महामेट्रोकडून शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गाचे काम सुरू आहे, तसेच शहरातील अनेक स्थानकांची कामेही सुरू असून, त्यासाठी मोठ्या प्रमाणात महामेट्रोकडे प्रशिक्षित कामगार आहेत.
हे कामगार एकाच ठिकाणी राहायला असून, त्यांच्यासाठी लेबर कॅम्पची सुविधा महामेट्रोनेच केलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पूरस्थिती उद्भवल्यास अथवा तातडीच्या मदतीसाठी मेट्रोचे कामगार महापालिकेस तातडीने उपलब्ध झाल्यास त्यांची मोठी मदत होणार असल्याचे सोनुने यांनी स्पष्ट केले.
सर्व विभागांच्या कामकाजात सुसूत्रता
शहरात पावसाळ्यातील पूर व्यवस्थापनासाठी महापालिका, स्मार्ट सिटी, पोलीस, महामेट्रो, तसेच पाटबंधारे विभागांच्या कामकाजात सुसूत्रता आणली जाणार आहे. त्यासाठी या सर्व विभागांची एकत्रित बैठक घेऊन पावसाळ्यात माहितींची देवाण घेवाण संयुक्त स्वरूपात केली जाणार आहे. हे सर्व विभाग महापालिकेच्या, तसेच विभागीय आयुक्तांच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी जोडले जाणार आहेत.