माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांच्या पाठपुराव्यास यश
दिवे : आळंदी-पढंरपूर पालखी मार्ग गेल्या 20 वर्षांपासून अधिक काळाने पुरंदर तालुक्यात केवळ राजकारण्यांच्या अडवा आणि जिरवा व श्रेय वादात अडकला. त्यानंतर कित्येक लोकांचे बळी गेल्यानंतर का होईना एकदाचे या महामार्गाच्या कामाला मुहूर्त मिळाला असल्यने त्यातही आता खोड येऊ नये म्हणजे झाले.
सध्या तरी या कामासाठी दिवे गावचे तथा माजी सनदी अधिकारी संभाजी झेंडे यांचे सहकार्य लाभत असून येणाऱ्या अडचणी सोडवडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यास यशही आले आहे.
बारामती लोकसभामतदार संघातून जाणारा हडपसर ते लोणंद हा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग राज्य सरकारने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (एनएचआय) हस्तांतरित केल्यानंतर त्यांनी या कामाला मंजूरी दिली व त्यातील झेंडेवाडी (ता. पुरंदर) ते लोणंद या कामाची निविदा निघाल्यानंतर आता कामालाही सुरूवात झाली आहे.
हडपसर ते झेंडेवाडी हा मार्ग दिवे घाट भागातील भाग वनविभागाच्या हद्दीतील असल्याने वन विभागाची परवानगी नसल्याने हा रस्ता रखडला होता. या मार्गाला परवानगी मिळावी यासाठी शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे संभाजी झेंडे यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यास यश आल्याने वनविभागाने देखील या रस्त्याच्या कामासाठी परवानगी दिली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे कार्यालयाकडून दिल्लीला निविदेसाठी आवश्यक कागदपत्रे गेली असून शुक्रवारी (दि. 27 जानेवारी) संभाजी झेंडे यांनी गुरूमवाडी (ता. पलूस) येथे शरद पवार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची एकत्रित भेट घेतली व या कामासंदर्भातील प्रक्रिया लवकर करण्याची विनंती केली. यावेळी गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून कामासही प्रारंभ
झाला आहे.
डांबरीकरण, ओव्हर ब्रीज, उड्डाणपूल
या चौपदरीकरणाच्या कामासाठी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण आणि फुरसुंगी रेल्वे लाइनवर रेल्वे ओव्हर ब्रीज बांधण्यात येणार असून वडकी व उरळी देवाची रस्त्याच्या प्रवेशद्वाराजवळ अंडरपास आणि मंतरवाडी चौकात तसेच एसपी इन्फोसिटी सेंटरसमोर उड्डाणपूल (फ्लायओव्हर) उभारण्यात येणार असल्याने हा मार्ग व्यवस्थित आणि वाहतुकीस सुरळीत होणार असून वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.