पुणे – सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. जनतेला महागाईचे, दुष्काळाचे चटके बसू लागले आहेत. पण, सरकार कुठलीही दखल घेताना, जनतेला मदत करताना दिसत नाही, अशी टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी गुरुवारी केली. दरम्यान, राज्यातील सद्यस्थितीची दखल घेऊन राज्यपालांनी सरकारला सूचना द्याव्यात, अशा आशयाचे पत्रही धंगेकर यांनी पाठवले आहे.
धंगेकर यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवून राज्यातील दुष्काळाकडे, वाढत्या महागाईकडे, आरक्षणाच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सध्या पक्ष फोडण्याचे सत्र सुरू आहे. अन्य पक्षांतील नेते पक्षात घेण्यात भाजप दंग आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या जाहीर सभा घेत आहेत. मात्र, राज्यात अनेक भागात सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. उन्हाळ्याच्या उंबरठ्यावरच पाणी टंचाईचे चटके बसू लागले आहेत.
आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याकडेही सरकार दुर्लक्ष करीत आहे. मराठा आणि ओबीसी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र आहेत. त्यामुळे सरकारने अत्यंत संवेदनशीलतेने हा प्रश्न सोडवायला हवा. मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. याकडेही सरकार कानाडोळा करत आहे, असा आरोप धंगेकर यांनी केला आहे.