नगर – नगर तालुक्यातील साकतखुर्द येथील तरुणांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ शनिवार (दि. १७) नगर -सोलापूर महामार्ग अडऊन रास्तारोको आंदोलन केले. यामध्ये दहिगाव, शिराढोण, वडगाव तांदळी, साकत बुद्रुक, रुईछत्तीसी, वाटेफळ येथून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देण्यात आल्या तसेच निषेध नोंदवण्यात आला.
मराठा आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटी हे उपोषणास बसले आहेत. यापार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनासाठी साकतखुर्द येथील मराठा बांधवांनी शनिवारी सकाळी नगर -सोलापूर महामार्गांवर रास्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त केला. उपोषणा दरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली असून शासनाने यावर अद्याप कुठलाही तोडगा न काढल्याने मराठा समाज आक्रमक झाला आहे. या वेळी आंदोलनकर्त्यांकडून निवेदन देण्यात आले.
यावेळी मा. जि. प. सदस्य बाळासाहेब हराळ, भाजपा युवा नेते दादासाहेब दरेकर, मधुकर म्हस्के, सरपंच डॉ. नंदू पवार, उपसरपंच बाबासाहेब चितळकर, मदास चितळकर, मोहन वाघमोडे, डॉ. विशाल बोचरे, श्रीधर पवार, संभाजी पवार, पोपट पवार, पोपट चितळकर, रामदास दरेकर, गोवर्धन पवार, अविनाश पवार, संपत वाघमोडे, अशोक मुंगसे, नागेश वाघ, उद्धव शिंदे, शिवाजी बोचरे, महेश पवार, प्रवीण पवार यासह पंचक्रोशीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
पोलिसांचा चोख बंदोबस्त
साकतखुर्द येथे सकाळ पासूनच पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला. रास्ता रोको आंदोलनाला कुठेही हिंसक वळण लागो नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस ठाण्याचे स. पो. नि. प्रल्हाद गिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला.
आंदोलनाला धनगर बांधवांचा पाठिंबा
मराठा आरक्षणा संदर्भात साकत खुर्द येथे झालेल्या रास्तारोको आंदोलनास साकत गावातील धनगर बांधवांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग नोंदवला. गावात धनगर समाज बहुसंख्य आहेत. सर्व समाज एक मेकांच्या सुखदुःखात सहभागी होत असतात. त्यामुळे गावात पुन्हा एकदा एकीचे दर्शन पाहावयास मिळाले.