पुणे –महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला आहे.
परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय जगताप हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर गेले आहेत. त्यातच ते 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. यामुळे परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपविण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अखेर राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडेच परीक्षा परिषदेची प्रभारी सूत्रे सोपवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला आहे.
मूळ कार्यभार सांभाळून तत्काळ अतिरिक्त कार्यभार धारण करावा व तसा अहवाल शासनास व शिक्षण आयुक्तालयास सादर करावा, असे आदेश शिक्षण आयुक्तालयातील सहसंचालक डॉ. अशोक भोसले यांनी जारी केले आहेत. शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत अतिरिक्त कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आला आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.