पुणे – शहरासह जिल्हा गारठा असून, महाबळेशवर पेक्षाही पुणे अधिक थंड झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी शहरातील एनडीए परिसरात नीचांकी 7.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर शिरूर तालुक्यात सर्वांत कमी 7.4 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हा आकडा हंगामातील नीचांकी ठरला आहे.
मागील आठ दिवसांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे 15 अंशापर्यंत गेलेला पारा मागील दोन दिवसात 7 अंशापर्यंत खाली आला आहे. जिल्ह्यातील15 हून अधिक भागांत 10 अंश सें. पेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे सकाळी दाट धुके आणि दुपारपर्यंत थंडीचा जोर जाणवत आहे. पुढील आठ दिवस हा थंडीचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
शहराच्या मध्यवर्ती भागात किमान तापमान 8.6 अंश
शहराच्या मध्यवर्ती भागात यंदाच्या हंगामात 10 अंशाच्या खाली किमान तापमान गेले नव्हते. मात्र, मागील दोन दिवसांत सातत्याने पार खाली येत असल्याने गुरूवारी (दि. 25) किमान तापमान 8.6 अंश इतके नोंदविण्यात आले. शिरूर 7.4, एनडीए 7.6, हवेली आणि माळीन 7.8, शिवाजीनगर 8.6, बारामती ८.7, दौंड 9.2, राजगुरूनगर 9.4, पाषाण 9.5, नारायणगाव आणि आंबेगाव 10, तळेगाव 10.4, पुरंदर 10.9, लवासा 11, इंदापूर 11.1, हडपसर 12.2, भोर 12.7, कोरेगाव पार्क 14, चिंचवड 14.9, मगरपट्टा 15.6, वडगावशेरी 17
राज्यात पुण्यात नीचांकी तापमानाची नोंद
राज्यात पुण्यात नीचांकी 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर त्या खालोखाल नाशिक 8.6, यवतमाळ 9, जळगाव 9.3, मालेगाव आणि औरंगाबाद 9.4, गोंदिया आणि अकोला 9.5, बुलढाणा 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.