गतवर्षीच्या मंडळांना मिळणार परवानगी
पुणे – ‘करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवात प्रतिष्ठापनेची आणि विसर्जनाच्या मिरवणुका काढू नयेत. मंडळांनी मंडपाच्या ठिकाणीच मूर्तीचे विसर्जन करावे,’ असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
“गतवर्षी ज्या मंडळांना मंडपाची परवानगी दिली आहे, त्यांनाच यंदा ती मिळणार असून, नव्याने कोणालाही परवानगी दिली जाणार नाही,’ असे महापौरांनी स्पष्ट केले. राज्य सरकारने गणेशोत्सवासंदर्भात मार्गदर्शक आचारसंहिता जारी केली आहे. त्यामध्ये गणेश प्रतिष्ठापना आणि विसर्जन तसेच देखावे, रोषणाई या संदर्भातही सूचना केल्या आहेत. भपकेबाजपणा आणि गर्दी टाळावी, शक्यतो ऑनलाइन दर्शनाची सोय करावी,’ असे आवाहन राज्य सरकारने मंडळांना केले आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीला सभागृह नेते धीरज घाटे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यासह महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते उपस्थित होते. बैठकीनंतर महापौर मोहोळ आणि रासने यांनी ही माहिती दिली. “मंडपासाठी मंडळांनी परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज न करता त्यांना गेल्या वर्षीच्या परवाना ग्राह्य धरून यावर्षी परवानगी देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुढील वर्षी तोच परवाना ग्राह्य धरून परवानगी देण्याचा निर्णयही घेण्यात आला,’ असे रासने म्हणाले.
करोनामुळे मंडळांनी यंदा मंडपातच गणेशमूर्तीचे विसर्जन करावे. दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन करणाऱ्या मंडळाने यंदा सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार चार फूट उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी, तर नागरिकांनीदेखील घरातील गणपतीचे विसर्जन घरीच करावे.
– मुरलीधर मोहोळ,महापौर