नीरा – गावातील नागरिकांची तपासणी करण्यासाठी नीरा (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी (दि. 22) प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी थर्मल तापमापक व ऑक्सिजन मापक देण्यात आलेला आहे. सरपंच दिव्या पवार आणि उपसरपंच विजय शिंदे यांनी हे साहित्य आशा स्वयंसेवक व आरोग्य सेवक यांच्या उपस्थितीत सुपूर्द केले. या माध्यमातून गुरुवार (दि. 23) पासून दररोज एक आशा स्वयंसेविका
किमान 200 लोकांच्या सर्वेक्षण करणार आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामपंचायतीच्या वतीने 10 थर्मल मीटर व 10 ऑक्सिमीटर प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आले आहे. यामध्ये ऑक्सिजन लेव्हर आणि तापमान तपासले जाणार आहे. त्यामुळे नीरा शहरात करोनाची साथ तात्काळ रोखण्यासाठी उपयोगी ठरणार असल्याची माहिती आरोग्य सेवक गणेश जाधव यांनी दिली.
ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण म्हणाले की, ग्रामपंचायतीच्यावतीने करोना विषाणूला अटकाव घालण्यासाठी आतापर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. नीरा ही मोठी बाजारपेठ असली तरी आजपर्यंत आपण करोनाला नीरा शहरामध्ये प्रवेश करू दिला नाही.
मात्र, आता प्रवेश झाला असल्याने दक्षता म्हणून आता इथून पुढे घरोघरी जाऊन लोकांची तपासणी करणे गरजेचे आहे. आणि म्हणूनच 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत मार्फत 10 लेझर तापमापक आणि 10 ऑक्सिमीटर प्राथमिक आरोग्य केंद्राला दिले आहेत. त्या माध्यमातून रुग्णाचा शोध घेणे सोपे जाणार आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल चव्हाण, दीपक काकडे, गणपत लकडे, आरोग्य सहायक शिवाजी चव्हाण उपस्थित होते.