भिगवण – येथे सोमवारी (दि. 21) चार रुग्ण बाधित आढळल्याने भिगवण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
चार बाधितांपैकी एकजण भिगवण स्टेशन येथील असून इतर भिगवण गावठाणातील आहेत. त्यातच काही व्यापारी असल्याने बाजारपेठेत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
30 जणांची चाचणी केली असून स्टेशन येथील 13 जणांची चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. रोहन कुंभार यांनी दिली. संपूर्ण परिसरालाच करोनाने विळखा घातला आहे. भिगवण, भिगवण स्टेशनसह परिसरातील अकोले, मदनवाडी व राजेगाव, मलठण (ता. दौंड) या गावांमध्ये रुग्ण आढळून आले होते. आता भिगवणला 4, स्टेशनला 6 मदनवाडीला 2 रुग्णसंख्या झाली.
दरम्यान, अकोले (ता. इंदापूर) येथे 11 जण बाधित आढळून आले होते. त्यांना इंदापूर येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. अकोलेकरांनी संयमाने परिस्थिती हाताळत तत्काळ गाव बंद करून सॅनिटायझर फवारणी, अंतराबाबत सुरक्षितता आदी नियम पाळून साथीचा प्रसार रोखला होता. आज 10 जणांना विलगीकरण कालावधीनंतर घरी सोडण्यात आले.