फिर्यादीस मारहाण करुन उजवा पाय केला फ्रॅक्चर
पुणे – सदनिकेच्या व्यवहारात दोन कोटी 40 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी गौतम पाषाणकर यांच्याविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी फिर्यादीस स्वत:च्या कार्यालयात नोकरांकरवी मारहाण करुण त्यांचा उजवा पायही फ्रॅक्चर केला आहे. कर्जदारांच्या तगाद्यामुळे वाहन चालकाकडे चिठ्ठी ठेऊन घर सोडून गेल्याने गौतम पाषाणकर मध्यंतरी चर्चेत आले होते. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करुन त्यांना शोधून काढले होते.
नरेंद्र पंडितराव पाटील (42,रा.पंचवटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार गौतम पाषाणकर, रिनल पाषाणकर आणी दीप पुरोहित यांच्याविरुध्द फसवणूकीसह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार यातील आरोपी यांनी त्यांचा स्वतःचा आर्थिक फायदा व्हावा या हेतुने मे प्रॉक्सिमा क्रिएशन बिल्डींग कन्स्ट्रक्शन खराडी येथील सी बिल्डींग मध्ये पी 101 व 102 मधील फ्लॅटची किंमत रुपये 2 कोटी 87 लाख ठरवुन तसे लेखी करारनामा करुन नरेंद्र पाटील यांचा विश्वास संपादन केला होता.
यानंतर त्यांच्याकडुन 2 कोटी 40 लाख रुपये घेवुन सदर मिळकतीचा ताबा व नोंदणीकृत दस्त केले नाही. तसेच सदनिकेचे खरेदीखत नरेंद्र पाटील यांच्या नावावर न करता फ्लॅट नं पी 102 हा सुशिल झोरर तर्फे कुलमुख्तीयार म्हणुन मनिषा गोदर (रा.रेंज हिल्स पुणे) व फ्लॅट नं पी 101 हा गणेश शिंदे ( रा. राजश्री कॉलनी,वडगाव शेरी पुणे) यांचे नावावर करुन दिलेले आहे.
तसेच नरेंद्र पाटील यांना 8 जुन 2020 रोजी जंगली महाराज रोड येथील पाषाणकर ग्रुप ऑफिसमध्ये बोलावून घेवुन त्यांनी व त्यांचे नोकारांनी मारहाण करुन उजवा पाय फ्रेंक्चर केला. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे करत आहेत.
नरेंद्र पंडीत यांनी कोणतीही सदनिका बुक केली नाही. ते कर्ज काढण्यासाठी आमच्याकडून कागदपत्रे घेऊन गेले होते. त्यांनी दिलेला धनादेश अद्यापही आमच्याकडे असून तो वटवलेला नाही. पुनावाला ग्रुपच्या नावाचा वापर करुन ते अशाप्रकारे ब्लॅकमेलिंग करत असतात.
– कपिल पाषाणकर