पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यात आगीचे सत्र सुरूच आहे. नुकतेच कोंढव्याजवळील गंगाधाम परिसरातील आईमाता मंदिराजवळ आगीची घटना घडली आहे. सध्या घटनास्थळी पुणे व पीएमआरडीए अशा एकुण 22 अग्निशमन वाहने आग नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र ही आग भीषण स्वरूपाची असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट दूरपर्यंत पसरले आहेत.
आईमाता मंदिराजवळ सुमारे 20 विविध साहित्याचे गोडाउन आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. यात बिस्कीट, सिमेंट, मोल्डिंग साहित्य यासारखे सामान होते. याशिवाय शेजारी मांडवाचे सामान ही पेटले आहे. या परिसरात रहिवासी लोकांची गर्दी आहे. त्यामुळे या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ही आग इतकी भीषण असल्याने अद्यापही वाहने घटनास्थळी आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. परंतु सुदैवाने अद्याप या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.