पुणे: – बाजारपेठेत चारचाकी वाहने आणण्यास बंदी केल्याने ग्राहकांना पायी फिरत खरेदीचा आनंद घेता आला. तुळशीबाग परिसराती हे चित्र.
पुणे – दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांच्या वाहनांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात शनिवारी प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली होती. यावर वाहतूक पोलिसांनी रविवारी शहराच्या मध्यवर्ती भागांतील व्यापारी पेठांत चारचाकी वाहनांना बंदी घालत पर्यायी वळण रस्ते दिले. यामुळे नागरिकांना खरेदीचा मनसोक्त आनंद लुटला आला.
दिवाळी सण चार दिवसांवर आला आहे. यातच शनिवार आणि रविवारची सुट्टी तसेच अनेकांचा बोनस आणि पगारही झालेला. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात खरेदीला उधाण आले होते. शनिवारी वाहतूक पोलिसांचे नियोजन चुकल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता. नागरिकही दिसले त्या गल्ली बोळातून वाहने नेत होती. तसेच दिसेल तिथे वाहने लावून खरेदीला गेली होती. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी रविवारी शिस्तबद्ध नियोजन केले होते.
असे केले नियोजन
- गाडीतळ पुतळा, कुंभारवेस, संत कबीर चौक आदी भागांतून “डायव्हर्जन’
- आवश्यक ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या मदतीला वॉर्डन कर्मचाऱ्यांची नियुक्ती
- मध्यवर्ती भागात फक्त दुचाकी आणि तीनचाकी वाहनेच सोडण्यात आली.
वाहन पार्किंगसाठी दमछाक
डायव्हर्जनमुळे मात्र चारचाकी वाहन चालकांना पार्किंगची जागा शोधण्यासाठी वणवण फिरावे लागत होते. नदीपात्र, बालगंधर्व रंगमंदिरालगतच्या पुलावर आणि महापालिकेच्या पुलावर तर काहींनी जुन्या बाजाराच्या पुलावर आपली चारचाकी वाहने पार्क केली होती.
…अन् रस्ते नागरिकांनी बहरले
शहरातील मध्यवर्ती भागांत नागरिकांना पायी फिरत खरेदीचा आनंद लुटता आला. प्रथमच मध्यवर्ती भागातील रस्ते वाहनांऐवजी नागरिकांमुळे बहरुन गेले होते. मध्यव्यस्तीत जिकडे तिकडे पायी फिरणारे नागरिकच दिसत होते. त्यामुळे व्यापारी बांधवांनाही हायसे वाटले.
” मध्यवर्ती भागात येणारी वाहतूक वळवण्यात आली होती. फक्त दुचाकी आणि रिक्षांनाचा प्रवेश दिला जात होता. वाहतूक नियोजनासाठी तीन अधिकारी आणि 40 कर्मचारी नेमले होते.” – संदीपान पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना