पुणे – मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी मोहीम राबविण्यात आली, त्याप्रमाणे आता राज्यभर ही प्रक्रिया मिशन मोडवर राबविण्यात यावी. शिंदे समितीने शिफारस केलेल्या पुराव्यांच्या आधारे कुणबी मराठा, मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही गतिमान करावी, आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार सोमवारपासून (दि.6) जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतंत्र कक्ष स्थापन केला जात आहे.
जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात वर्षभरात साडेबारा हजारांहून अधिक अर्ज केलल्या नागरिकांना कागदपत्रांच्या नोंदणी तपासून प्रमाणपत्र देण्यात येत आहे. आता व्यापक दृष्टीकोनातून आणखी नोंदी कागदपत्र सादर करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तळमजल्यावर स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात येणार येणार आहे. या कक्षासाठी एक नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
तर ग्रामीण पातळीवरून जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये येण्याची गरज नसून प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये देखील कक्ष सुरू करण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याच्या नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत.