पिंपरी – हाती पडलेली पगार व बोनसची रक्कम याशिवाय दिवाळीपूर्वीचा महिन्यातील पहिलाच रविवार असा दुग्धशर्करा योग रविवारी जुळून आल्याने अनेकांनी खरेदीचा मुहूर्त साधला. शहराच्या विविध भागातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीने पिंपरी कॅम्प ओसंडून वाहत होता. कपड्यांच्या दुकानांबरोबरच सुवर्ण विक्री दालने व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या दालनांतही खरेदीसाठी गर्दी दिसून आली.
पिंपरी-चिंचवडकरांनी रविवारी (दि.5) बाजारपेठेत खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. शहराच्या विविध भागातून खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या गर्दीमुळे पिंपरी कॅम्प फुलून गेला होता. दुपारनंतर गर्दीचा ओघ आणखी वाढला. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना पार्किंगसाठीही जागा उपलब्ध होत नव्हती. काही कपड्यांच्या दुकानाबाहेर चक्क रांगा लागल्या होत्या.
दिवाळी बहुतांश वेळा महिन्याच्या शेवटी येते. यंदा मात्र, दिवाळी महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यातच आली आहे. महिन्याचा पहिलाच रविवार असल्याने अनेकांचे पगार झाले आहेत. बहुसंख्यांच्या हाती बोनसचीही रक्कम पडली आहे. त्यामुळे पुढे खिसा रिकामा होण्याआधीच खरेदी करून घेण्यासाठी अनेकांनी पहिल्या रविवारचा मुहूर्त साधत परिवारासह मनसोक्त खरेदीचा आनंद लुटला. दुपारनंतर गर्दी काही प्रमाणात वाढू लागली. सायंकाळी तर गर्दीने उच्चांक गाठला. पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी झुंबड उडाली होती. संपूर्ण परिवारासह जोरदार खरेदी करून हातात पिशव्या घेऊन बाहेर पडणारे नागरिक दिसून येत होते.
नागरिकांनी कपडे खरेदीवर सर्वाधिक भर दिल्याचे दिसून आले. तयार कपड्यांच्या दालनांमध्ये गर्दी झाली होती. कपड्यांबरोबरच यासाठी आधीच रेडिमेड दागिने खरेदी करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेतही खरेदीसाठी ग्राहकांची लगबग होती. ऑनलाइन शॉपिंगचा पर्याय उपलब्ध असला तरी नागरिकांनी प्रत्यक्ष दुकानात येऊन खरेदी करण्याला प्राधान्य दिले. इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये स्मार्टफोन, एलईडी टीव्ही आणि वॉशिंग मशिन या उत्पादनांना मागणी होती.