पुणे – दिवाळी खरेदीसाठी बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या… दुकाने सजलेली…रस्त्यावर वाहतूक कोंडी… त्याच सायंकाळी पाच वाजता मेघगर्जना व विजांच्या कडकडाटांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक झालेल्या पावसामुळे लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, मंडई, टिळक रस्ता अशा व्यापारी भागांत दिवाळी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची तारांबळ उडाली. उपनगरीय भागात सिंहगड रस्ता, धनकवडी, कोथरूड, वारजे, कात्रज भागातही ठिकठिकाणी जोरदार पावसामुळे पाणी साचले होते.
शहरात मागील दोन दिवसांपासून वाढलेला उकाडा आणि ढगाळ वातवरणामुळे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. शुक्रवारी (दि. 10) सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते, तर काही भागात धुके होते. दुपारी चारच्या सुमारास आकाशात काळे ढग भरून आले.
शहरातील मध्यपेठा तसेच धनकवडी, कात्रज, सहकारनगर भागात पावसाला सुरुवात झाली. पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात पाच वाजता मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाला सुरुवात झाली. सुरुवातील अर्धा तास जोरदार पाऊस झाल्यानंतर, पावसाचा जोर काहीसा ओसरला. मात्र, सात वाजेपर्यंत संततधारेमुळे पुणेकरांची तारांबळ उडाली.
ढगाळ वातावरण आणि हलका पाऊस, त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय वाढ झाल्यामुळे उकाडा वाढला होता. मात्र, दि. 10 आणि 11 नोव्हेंबरला हलक्या सरी पडल्यानंतर दि. 12 नोव्हेंबरपासून शहरातील हवामान कोरडे राहील तर किमान तापमानात एक ते दोन अंशाने घट होईल. त्यामुळे रात्री थंडी आणि पहाटे धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.