खासदारांना आपली मालमत्ता जाहीर करावी लागणार
नवी दिल्ली – मंत्र्यांप्रमाणेच यापुढे प्रत्येक संसद सदस्यास आपली मालमत्ता व कर्जाची माहिती दरवर्षी जाहीर करावी लागणार आहे. तसे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येईल. केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधानांकडे मालमत्तेचा व कर्जाचा तपशील सादर केला आहे. तो जनतेला जाहीर करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देशातील सार्वजनिक जीवन स्वच्छ करण्यासाठी जनता सरकारचे जे निर्धाराने प्रयत्न चालू आहेत, त्या दृष्टीनेच हे निर्णय घेण्यात आले आहेत.
जगातील सर्वांत मोठी भूमिगत दुर्बिण
मॉस्को – रशियाने कॉकेशस पर्वतात बक्सान न्यूट्रिनो वेधशाळेत जगातील सर्वात मोठी भूमिगत दुर्बिण बसविली आहे. या दुर्बिणीतून सूर्यकिरणातील न्यूट्रिनो जातीचे किरणांचा वेग नोंदता येणार आहे.
बांगलादेशाच्या अध्यक्षांनी लष्करी कायदा शिथिल केला
डाक्का – बांगलादेशचे लष्करी अध्यक्ष जनरल झिया उर रहमान यांनी मार्शल लॉ खाली काढलेले सर्व हुकूम मागे घेतले असून सेशन्स जज व डी. मॅजिस्ट्रेट यांच्या स्वाधीन केले आहेत. या घटनेचा अर्थ राजकीय निरीक्षक असा लावीत आहेत, की लष्करी कायदा हळूहळू मागे घेण्याचा हा प्रस्ताव आहे.