पुणे – अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 8 हजार 51 विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेशच घेतलेला नाही. आता दुसरी फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.
यंदा पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील 308 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 10 हजार 725 प्रवेशाच्या जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीत प्रवेश घेण्यासाठी 31 ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. मात्र, प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात अडचणी येत असल्याने एक दिवस मुदतवाढ देण्यात आली. त्यानुसार बुधवारी सायंकाळी प्रवेश घेण्याची मुदत संपली. पहिल्या फेरीत 30 हजार 807 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे.
दुसऱ्या फेरीत 1 आणि 2 सप्टेंबरला विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा दुसरा भाग भरता येईल. आतापर्यंत नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांनाही नोंदणी करून प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरता येईल. तसेच अर्जाची पडताळणीही करून घेता येईल. प्रवेश अर्जाचा भाग दोन भरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी महाविद्यालय जाहीर करण्यासाठी विचार केला जाणार आहे.
दि. 4 सप्टेंबरला दुसऱ्या फेरीचे प्रवेश आणि महाविद्यालयांचे पात्रता गुण जाहीर केले जातील. त्यानंतर 4 ते 6 सप्टेंबरदरम्यान विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर “प्रोसिड फॉर ऍडमिशन’ करून, आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करून प्रवेश घेऊ शकतात. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रवेश न घेतल्यास विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेतून बाहेर जाईल आणि नियमित फेऱ्या संपल्यानंतर विशेष फेरीतून प्रवेश दिला जाणार असल्याचे अकरावी प्रवेश समितीकडून सांगण्यात आले आहे.
आता लक्ष दुसऱ्या फेरीकडे
पहिल्या फेरीत एकूण 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. त्यापैकी 30 हजार 807 विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश घेतला आहे. मात्र, उर्वरित 8 हजार 51 विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेता दुसऱ्या फेरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत आहे. पसंतीचे महाविद्यालय न मिळालेले विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या फेरीकडे लागले आहे.