पुणे (डॉ. राजू गुरव) – टीईटी घोटाळ्यामुळे शिक्षण विभागाला भ्रष्टाचाराचा कलंक लागला आहे. त्यामुळे उरलेली अब्रु वाचवण्यासाठी विभागाच्या मोठ्या पदांवर “डॅशिंग’ अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची गरज व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर “यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम, नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे या पदांवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यादृष्टीने जलद हालचालीही सुरू आहेत.
गेल्या काही वर्षांत शालेय शिक्षण विभाग सातत्याने बदनाम झाला आहे. लाचखोरीतून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाखोंची मायाही जमवली आहे. दरम्यान, टीईटी घोटाळ्याने या काळ्याकृत्यांवर शिक्कामोर्तबच केले. दरम्यान, राज्यातील शिक्षण विभागाची विविध प्रकरणे मुदतीत मार्गी लागत नसल्याने शिक्षक, कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी थेट शिक्षण आयुक्त कार्यालयात गाऱ्हाणे मांडण्यासाठी गर्दी करतात. यामुळे शिक्षण आयुक्तांची डोकेदुखीही वाढत असते. त्यामुळे आता विभागाला शिस्त लावण्यासाठी यंत्रणेच्या कामकाज पद्धतीत मोठे बदल करण्याची गरज आहे.
प्रधान सचिवपदी एस. चोक्कलिंगम?
शालेय शिक्षण विभागाचे पहिले आयुक्त एस.चोक्कलिंगम हे होते. ऑक्टोबर 2013 ते फेब्रुवारी 2015 या कालावधीत “झीरो पेंडन्सी’ला प्राधान्य दिले होते. संगणकीकृत कामकाजाचाही आग्रह धरला होता. शिस्तप्रिय व डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे. सध्या ते यशदा येथे महासंचालक आहेत. दरम्यान, शिक्षण विभागातील प्रधान सचिवांचे पद रिक्त असून तेथे चोक्कलिंगम यांची नियुक्ती होणार असल्याचे शिक्षण वर्तुळात बोलले जात आहे.
शिक्षण आयुक्तपदी सुरज मांढरे?
आसाम केडरमधील आयएएस अधिकारी असलेले शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांचा चार वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे. सोळंकी यांनी शिक्षण विभागाला शिस्त लावण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांच्या “मवाळ’ स्वभावाचा बहुसंख्य अधिकाऱ्यांनी गैरफायदाच घेतला आहे. दरम्यान, आता सोळंकी यांची बदली होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शिक्षण आयुक्त पदी नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची नियुक्ती होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.