पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे. त्यात मागील दोन दिवसांपासून मुठा नदीत रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचे समोर आले आहे. संगमघाट आणि वैकूंठ स्मशानभूमीमागील आंबिल ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात फेसाळयुक्त प्रवाह निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
मुळा-मुठा नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी थेट सोडले जाते. यामुळे नदीतील जैवसृष्टी संपुष्टात आली असून, नदीला पुनरुज्जीवन देण्यासाठी तब्बल 1500 कोटींचा खर्च करून मुळा-मुठा नदीसुधार योजना प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीत मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत असले, तरी अद्याप थेट रसायन मिश्रीत पाणी कधीही येत नव्हते. मात्र, मागील दोन दिवसांपासून संगमघाट तसेच आंबिल ओढ्यातून येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाण्याला मोठ्या प्रमाणात फेस येत असल्याचे चित्र आहे. याबाबत महापालिकेच्या पर्यावरण विभागाशी संपर्क मात्र होऊ शकला नाही.