पंचमी हॉटेल चौकात बीआरटी मार्गावरील स्थिती
सहकारनगर – पुणे-सातारा रस्त्यावरून स्वारगेटकडे येणाऱ्या वाहनांना पंचमी हॉटेल चौकातून हडपसर व सारसबागकडे जाण्यासाठी उड्डाणपूलकडे जावे लागते. मात्र, बीआरटी मार्गावरील लोखंडी रेलिंगमुळे चालकांचा गोंधळ उडत आहे. यातून या ठिकाणी वाहतूक कोंडीसह अपघातही घडत आहेत.
पंचमी हॉटेल चौकातून स्वारगेट, सारसबाग व हडपसरकडे जाणाऱ्या वाहनांची कोंडी होत आहे. स्वारगेटकडे जायचे असेल तर बीआरटी मार्गातून लक्ष्मी नारायण टॉकीजकडून जावे लागत आहे. त्यामुळे मागून येणाऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होतो. तसेच, उड्डाणपूल पासून ते पंचमी चौकापर्यंत लोखंडी रेलिंग असल्याने एसटी कॉलनी, साईबाबा वसाहतीतील नागरिकांना रस्ता ओलांडताना लक्ष्मीनारायण टॉकीजकडून किंवा पंचमी चौकातून फिरून जावे लागत आहे.
लोखंडी रेलिंग चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आल्याने ते काढून रस्ता मोकळा करावा. पंचमी हॉटेल आणि काका हलवाईच्या मधील रस्ता लहान असल्यामुळे तेथेही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सहकारनगरकडून येणाऱ्या रस्त्याला दुभाजक करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
सातारा रस्त्याचे बीआरटीचे काम 90 टक्के पूर्ण झाले असून पंचमी हॉटेल चौकात बीआरटी कामाचा महत्त्वपूर्ण भाग म्हणून रेलिंग बसविण्यात आले आहेत त्याला प्लॅस्टिकचे डिव्हायडर पर्याय ठरू शकत नाहीत. बीआरटी सुरू झाल्यावर येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
– अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथविभाग
पंचमी हॉटेल चौकात दररोज अपघात होतात. रस्ता ओलांडण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागते. येथून भुयारी मार्ग बराच दूर आहे. अस्वच्छता व भीती पोटी नागरिक त्याचा वापरत करीत नाहीत. पादचाऱ्यांसाठी येथे पूल बांधता येईल का, याबाबत तातडीने महानगरपालिकाकडून निर्णय होणे गरजेचे आहे.
– पुरंदर पुजारी, सामाजिक कार्यकर्ते
महानगरपालिकेच्या नियोजन शून्य कारभाराचे प्रतिक म्हणून हा चौक घोषित करावा, असे माझे मत आहे. नागरिकांच्या करातून येणारा पैसा सातारा रस्त्यावर उधळण्यात आला आहे. गरज नसताना सायकल ट्रॅक व पदपथावर खर्च करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी आणि अपघात या नित्याच्याच बाबी झाल्या आहेत.
– ललित ओसवाल, नागरिक