पुणे : खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, शस्त्र जवळ बाळगणे आणि चोरी अशा प्रकारचे नऊ गुन्हे दाखल असलेल्या सराईताकडून दोन गावठी पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे असा एक लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखा युनिट एकचा पोलिसांनी ही कामगिरी केली.
रोहित दिलीप माने (वय 28, रा. अजिंक्य मित्र मंडळाजवळ, लोहियानगर) याकडून शुक्रवारी (ता. 25) ही शस्त्रे जप्त करण्यात आली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंभीर गुन्ह्यांना प्रतिबंध होण्यासाठी युनिट एकच्या क्षेत्रात पेट्रोलिंग सुरू होते. त्यावेळी पोलिस नाईक अमोल पवार आणि पोलिस हवालदार अजय थोरात यांना माहिती मिळाली की, माने हा घोरपडे पेठेतील एकबोटे कॉलनीत उभा असून त्याकडे पिस्तूल आहे. त्याद्वारे तो दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. या माहितीची खात्री केल्यानंतर माने याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याकडे पिस्तूल व काडतुसे सापडली. या प्रकरणी पोलिस अंमलदार अमोल पवार यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलिस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, सतीश भालेकर, योगेश जगताप यांनी ही कामगिरी केली.