“दौंड शुगर’ प्रतिदिन 17 हजार 500 टन गाळप करणार
देऊळगावराजे – दौंड शुगर कारखान्यावर शेतकऱ्यांनी जो विश्वास ठेवला त्या विश्वासाला पात्र राहून शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक बाजारभाव देण्यास कटिबद्ध आहे. कारखान्यांमुळे या भागात सुबत्ता आली. व्यवसाय-धंदे सुरू झाले, शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट मिळाल्याने शेतकरी समाधानी आहे, आपल्या सर्वांच्या सहकार्याने “दौंड शुगर’ची घोडदौड सुरू आहे. यापुढे कारखाना प्रतीदिन 17 हजार 500 टनांपर्यंत ऊस गाळप करणार असल्याने या भागातील कुठल्याही शेतकर्यांचा ऊस शिल्लक राहणार नसल्याचे सुनेत्रा पवार यांनी मत व्यक्त केले.
आलेगाव (ता. दौंड) येथील दौंड शुगर कारखान्याचा 15वा गळीत हंगाम बारामती टेक्सटाइल्स पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी पवार बोलत होत्या. यावेळी दौंड शुगरचे अध्यक्ष जगदीश कदम, माजी आमदार रमेश थोरात, माजी आमदार उषादेवी जगदाळे, दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, माळेगाव कारखान्याने अध्यक्ष केशवराव जगताप, भवानीनगर अध्यक्ष प्रशांत काटे, सोमेश्वर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, बारामती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष सचिन सातव, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबे, आप्पासाहेब पवार, दादा पाटील फराटे, उत्तम आटोळे, वैशाली नागवडे, संगीता जगदाळे यांसह शेतकरी उपस्थित होते.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष जगदीश कदम म्हणाले, 2009 मध्ये कारखान्याला सुरुवात झाली. अवघ्या दहा महिन्यांत कारखाना सुरू झाला. आपल्या सर्वांच्या सहकार्याने दौंड शुगरला सर्वाधिक पारितोषिके मिळाली. गेल्या वर्षी पूर्ण एफआरपी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. सर्वांची दिवाळी गोड व्हावी, यासाठी दौंड शुगरो 75 रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांना सोमवारी खात्यावर वर्ग केला जाईल.
जगदीश कदम, अध्यक्ष, दौंड शुगर कारखाना
दौंड तालुक्यात चार साखर कारखाने असून, सर्वात अधिक बाजारभाव दौंड शुगरने दिल्याने तालुक्यातील शेतकरी समाधानी आहे. तालुक्यामध्ये गुऱ्हाळाचे प्रमाणात जास्त असून, ऊस शिल्लक राहत होता. मात्र, दौंड शुगर कारखाना साडेसतरा हजार मेट्रिक टन झाल्यामुळे एकाही शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहणार नाही.
रमेश थोरात, माजी आमदार
दौंड शुगर कारखान्याचे सतरा लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लागणारी सर्व यंत्रणा सज्ज असून दौंड शुगर कारखान्याना ऊस द्यावा. शेतकर्यांसाठी कारखान्यामार्फत विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये ड्रिप, कंपोस्ट खत, औषधे आदी सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.
– वीरधवल जगदाळे, संचालक, दौंड शुगर कारखाना.