डोर्लेवाडी, (वार्ताहर) – महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार उमेदवार होत्या आणि यांच्यामध्ये खरी लढत झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी देखील कमी प्रमाणात झाली आहे. यामध्ये ही लढत अत्यंत चुरशीची झाल्याने निकाल काय लागेल, याचे विश्लेषण करणे अवघड आहे. मात्र, बारामती शहर आणि ग्रामीण भागात दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून आमचाच उमेदवार विजयी होईल, अशी खात्री देत पैजा देखील लावत आहेत.
बारामतीच्या निकालावर कार्यकर्त्यांकडून पैजा लागल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. यात एकूण २३ लाख ७२ हजार ६६८ मतदार होते. त्यापैकी १४ लाख ११ हजार ६२१ मतदान झाले आहे.
म्हणजेच ५९.५० टक्के मतदान झाले आहे. टक्केवारी कमी झाल्याने याचे विश्लेषण करता येत नाही. मात्र, दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांकडून आमचा उमेदवार निवडून येणार, असे म्हणत वेगवेगळ्या पद्धतीने पैजा लागत आहेत.
गेल्या दोन महिन्यापासून तालुक्यात प्रचाराचा उडालेला धुरळा मतदानानंतर शांत झाला. आता शहरात आणि ग्रामीण भागात चौकात कार्यकर्त्यांमध्ये पैजा लागत आहेत. यात जेवणावेळी, पैसे, फिरायला घेऊन जाणे, संपूर्ण पोशाख यासह अन्य पैजा कार्यकर्त्यांमध्ये लागल्या आहेत.