पुणे – नोव्हेंबरमध्ये महिना सुरू झाला आहे. दिवाळी सणामुळे हा महिना सुट्ट्यांचा तसेच मोठ्या उलाढालीचा मानला जातो. त्यामुळे या महिन्याभरात अनेक सामान्य नागरिक अर्थ नियोजन करीत असतात, त्यामुळेच या महिन्यात बदलांबाबत माहिती असणे गरजेचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा आर्थिक फटका बसू शकतो. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या सर्व प्रमुख बदलांत अगदी जीएसटीपासून लॅपटॉप आयातीपर्यंतच्या अनेक बदलांचा समावेश आहे.
- गॅस सिलिंडर किंमती स्थिर…
एलपीजी सिलिंडर किंमतीचा आढावा कंपन्या प्रत्येक महिन्याच्या दि.1ला घेत असतात. महिन्याच्या दि.1ला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होत असतो. नोव्हेंबर महिन्यात एलपीजी किंमती स्थिर असेल. या किमतींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही म्हणजेच सध्याचे दर कायम ठेवले जाणार असल्याचे कंपन्यांकडून सचित करण्यात आले आहेत. - जीएसटी चलन अपलोड…
नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर अर्थात एनआयसीनुसार, 100 कोटी किंवा त्याहून अधिक उलाढाल असलेल्या व्यवसायांना दि. 1 नोव्हेंबरपासून 30 दिवसांच्या आत ई-चलन पोर्टलवर जीएसटी चलन अपलोड करावे लागणार आहे. जीएसटी प्राधिकरणाने सप्टेंबरमध्ये हा निर्णय घेतला होता. - संगणकीय वस्तूंबाबत…
सरकारने एचएसएन 8741 कॅटेगरीतील लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. मात्र, दि.1 नोव्हेंबरपासून काय होणार? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली नाही. - इक्विटी डेरिव्हेटिव्ह व्यवहार शुल्क…
दि.1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढणार आहेत. हे बदल एसपी बीएसई सेन्सेक्स पर्यायांवर लागू असतील. व्यवहाराच्या वाढत्या खर्चाचा व्यापाऱ्यांवर, विशेषतः किरकोळ गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होईल. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने याबद्दल माहिती दिली होती. - महिन्यांत 15 सुट्ट्यांमुळे…
नोव्हेंबरमध्ये गुरुनानक जयंती, दिवाळी असल्याने सुट्ट्या अधिक असतील, साधारण 12 दिवस सुट्टी असणार आहे. नोव्हेंबरमध्ये रविवारच्या सुट्ट्या मिळून एकूण 12 ते 15 दिवस सुट्ट्यास होतात. यानुसार छोटे मोठे व्यवहार, खरेदी आदींचे नियोजन ठरवावे लागणार आहे. - स्टॉक मार्केट 10 दिवस बंद…
स्टॉक मार्केटमध्येही या महिन्यांत सुट्ट्या आहेत. नोव्हेंबरमध्ये शेअर मार्केट 10 दिवसांसाठी बंद राहणार आहे. बीएसई आणि एनएसईच्या शेड्युलनुसार या 10 दिवसांच्या सुट्ट्यांमध्ये सण, शनिवार आणि रविवार यांचादेखील समावेश आहे.