वीसगाव खोरे : खानापूर (ता. भोर) येथे गुरुवारी (दि. 26) रानडुकराची शिकार करून गावात मांस विकताना एक व्यक्ती वनविभागाच्या जाळ्यात सापडला.
या घटनेत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव राजा हिंदुस्तानी किरट पारधी (रा. मध्य प्रदेश) असे आहे. खानापूर परिसरात पारधी समाजाच्या टोळीने रानडुक्कर या वन्य प्राण्याची शिकार केली होती. काही वेळाने या डुकराचे मांस तीन ते चार जण खानापूर येथे विक्री करत असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना मिळाली.
वनविभागाच्या अधिकारऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ सापळा रचून खानापूर येथे राजा हिंदुस्तानी किरट पारधी या शिकार करणाऱ्या टोळीतील एका तरुणाला ताब्यात घेतले. इतर दोन जण पळून गेले आहेत. ताब्यात घेतलेल्या पारधीला भोर न्यायालयात हजर केले असता, एक दिवसाची वन कोठडी देण्यात आली आहे.
पुणे उपवनसंरक्षक महादेव मोहिते व सहायक वनसंरक्षक (प्रादेशिक) शितल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी राऊत, वनपाल एस. आर. खट्टे, वनरक्षक पी. डी. गुट्टे व एस. के.होनराव, के. पी. देठे, व्ही. आर. आढागळे. के. एस. हिमोने पुढील तपास करीत आहेत.
+