रेल्वे स्थानकाला भेटी
पारगाव – मध्य रेल्वे विभाग, दौंड जंक्शन व तालुक्यातील रेल्वे संबंधित विविध प्रश्न मार्गी लावले जाणार आहेत, अशी ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिली. दौंड येथे दानवे यांनी दौंड जंक्शनला भेट दिली. यावेळी बैठकीमध्ये रेल्वेचे संबंधित अधिकारी, रेल्वे प्रवासी संघटना, कार्यकर्ते, प्रवासी, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी पुणे -दौंड दैनंदिन प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मागण्या व विविध समस्या उपस्थित केल्या. यावेळी दानवे यांना मागण्यांचे निवेदन दिले. बैठकीत दौंड हे रेल्वेचे उपनगर म्हणून घोषित करण्यात यावे व पुणे-लोणावळा लोकल सेवेप्रमाणेच पुणे आणि दौंड दरम्यान लोकल सेवा सुरु करावी, दौंड तालुक्यातील सहजपूर, खामगाव येथे मंजूर करण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचे काम जलद सुरु करण्यात यावे,
खुटबाव येथील रेल्वे फाटकावर रेल्वे उड्डाणपूल उभारण्यात यावा, कडेठाण व कानगाव येथे सुरु असलेल्या RUB चा कामाच्या ठिकाणी असलेली तांत्रिक अडचण लक्षात घेता कडेठाण व कानगाव येथे रेल्वे उड्डाणपूल प्रस्तावित करावेत, दौंड-पुणे मार्गादरम्यान मेमू ट्रिपची वारंवारता वाढवावी, दौंड – हडपसर डेमू गाडी पुण्यापर्यंत चालवावी, हडपसर – सोलापूर डेमू एक्सप्रेसला मांजरी, यवत, खुटबाव, कडेठाण आणि पाटस स्थानकांवर थांबा मंजूर करावा,
छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक (सीएसएमटी)-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दौंड जंक्शन येथे थांबा द्यावा, दौंड-पुणेदरम्यान धावणाऱ्या मेमू लोकलचे दर पूर्वीप्रमाणे आकारावेत, एक्स्प्रेस आदी सुपर फास्ट लांब पल्ल्यांच्या गाड्यांना दौंड स्थानकात थांबा द्यावा, वाढती लोकसंख्या व नागरीकीरण लक्षात घेता पुणे – दौंड रेल्वे ट्रॅकचे चौपदरीकरण करावे व यवत आणि उरुळीच्या मध्ये सहजपूर, उरुळी आणि लोणी स्थानकांच्या मध्ये नायगाव, मांजरी, हडपसरच्या मध्ये अमनोरा आदी ठिकाणी नवीन स्थानकांची निर्मिती करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी सर्व मागण्यांबाबत रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.