लोणावळा – येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथील मंदिरात प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. लोणावळा शहरातील रहिवासी असलेले डॉ. शैलेश शहा यांच्या पत्नी अंजना व मुलगा यश यांची निर्मिती असलेले ‘अयोध्यानगरी पावनधाम, विराजे मेरे प्रभू श्रीराम’ हे भजन प्रत्यक्ष राममंदिरात वाजण्याच्या मान मिळाला आहे. समस्त लोणावळेकरांच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे.
सध्या देशात रामभक्तीवर हजारो गाणी तयार होत आहे, मात्र त्यातील ज्या गाण्यांना प्रत्यक्ष अयोध्या राम मंदिरात वाजण्याचे भाग्य मिळत आहे हे भजन पार्श्वगायक कुमार शानु, साधना सरगम, शाहिद मल्ल्या, हॅरी मल्ल्या यांनी गायले असून हे गीत अभय कुमार राय यांनी लिहले आहे. हे गीत कुलदीप संधू यांनी संगीतबद्ध केले आहे.
या गीताची निर्मिती करणार्या अंजना शहा आणि त्यांचे पती डॉ. शैलेश शहा यांचा रविवारी लोणावळा शहर भाजपकडून सन्मान सत्कार करण्यात आला. हा सत्कार स्वीकारत असताना माझे मन भरून आले आहे. हा सत्कार स्वीकारताना मी खूप कृतज्ञ झाले आहे, अशी भावना यावेळी अंजना शहा यांनी व्यक्त केली. तर आम्हा लोणावळेकरांसाठी उर अभिमानाने भरून येण्यासारखी गोष्ट असल्याचे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले. अशीच भावना माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी व शहराध्यक्ष अरुण लाड यांनी व्यक्त केली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, भाजपचे शहर अध्यक्ष अरुण लाड, माजी अध्यक्ष रामविलास खंडेलवाल, महिला आघाडी अध्यक्ष विजया वाळंज, प्रदेश सदस्य आशिष बुटाला, अर्जुन पाठारे, योगिता कोकरे, श्रद्धा बेदरकर, बाबू संपत, संकेत निकुडे, चारूलता कमलवार, पार्वती रावळ, भारती महाडिक, मुक्ता गव्हाणे, संध्या निकाळजे आदी उपस्थित होते.