देऊळगावराजे येथे पशूधन धोक्यात : अधिकारी पद रिक्त
देऊळगावराजे – दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील देऊळगावराजे येथे पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने शेतकऱ्यांच्या जनावरांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून दवाखान्यामध्ये कुठलेच अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तसेच अनेक दिवसापासून दवाखाना बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहेत. सध्या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे बाहेर गावावरून येणाऱ्या जनावरांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना जनावरांना लाळ, खुरकत रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे यावर उपचार करण्यासाठी शेतकरी पशुवैद्यकीय अधिकारी यांना फोन करून बोलवत आहेत. पण ते वेळेवर उपलब्ध होत नाही.
देऊळगावराजे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसायाला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे शेतकरी लाखो रुपये गुंतवणूक करून गाई आणि म्हशीची खरेदी करीत आहे. परंतु पशुवैद्यकीय दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी यांना जनावरांचे कुठलेच गांभीर्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
पशुवैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत जनावरांच्या विविध आजारांवर राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन जनावरांना लसीकरण करण्याचे आहे. तसे आदेश असताना सुद्धा पशुवैद्यकीय अधिकारी कुठलेच लसीकरण करीत नाहीत, असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून द्यावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली आहे.
देऊळगावराजे येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांची रिक्त जागा असून त्याचा अतिरिक्त कारभार मलठण येथील पशुवैद्यकीय अधिकारी संजय शेलार यांच्याकडे दिला असून त्यांच्याकडे दोन्ही गावांचा मोठा लोड असल्यामुळे ते उपलब्ध होत नसतील, त्यामुळे देऊळगावराजे येथील रिक्त जागा भरण्यात यावी यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे विनंती अर्ज केला आहे.
एस. के. आटोळे, तालुका वैद्यकीय अधिकारी, दौंड.