सासवडमध्ये भजन स्पर्धा उत्साहात : स्व. चंदूकाका जगताप यांच्या पुण्यस्मरणाचे औचित्य
सासवड – सहकारमहर्षी स्व. चंदूकाका जगताप यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भजन स्पर्धेत खुल्या गटात तक्रारवाडीच्या विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळाने तर बाल गटात फुरसुंगीच्या प्रेमराज बाल भजनी दत्त मठ मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला.
सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्व. चंदूकाका जगताप यांच्या कुटुंबीयांच्या वतीने आणि सनदी अधिकारी राजेंद्र जगताप व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
बाल गटामध्ये उत्कृष्ट गायक म्हणून पारेश्वर बाल भजनी मंडळ पारगाव, उत्कृष्ट मृदंग वादक मुक्तेश्वर बाल भजनी मंडळ वडकी, उत्कृष्ट हार्मोनियम वादक शिवाजी इंग्लिश मिडीयम स्कूल,
सासवड यांना देण्यात आला. खुल्या गटामध्ये उत्कृष्ट तबला वादक श्री गणेश भजनी मंडळ जेजुरी, उत्कृष्ट हार्मोनियम वादक ऋणानुबंध भजनी मंडळ खळद, उत्कृष्ट गायक म्हणून विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ एखतपूर यांना पुरस्कार देण्यात आले. संगित अलंकार नामदेव शिंदे, तबला अलंकार सतीश काळे यांनी स्पर्धांचे परीक्षण केले.
सुप्रसिद्ध निवेदक महेश राऊत यांनी सोहळ्याला साजेसे निवेदन केले. तबला विशारद अमोल बेलसरे, संगीत अलंकार ऐश्वर्या कामठे, श्रीकांत जाधव, तात्यासाहेब फडतरे, रविंद्र जाधव यांच्या गायनाने समारोप झाला. स्पर्धांचे परीक्षक सतीश काळे व नामदेव शिंदे यांनी केले.
वारकरी संप्रदायाला प्रोत्साहन देण्यासाठी भजनी मंडळांना आत्तापर्यंत हार्मोनियम, पकवाज, तबला, वीणा, टाळ, सतरंजी आदी साहित्य तसेच सकल गाथा, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे नवीन पिढीही या संप्रदायाकडे वळत असून यावर्षी 115 खुल्या व 20 बाल भजनी मंडळांनी सहभाग नोंदविला.
विजेते संघ
खुला गट : विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ तक्रारवाडी, संत ज्ञानेश्वर भजनी मंडळ हांडेवाडी, अष्टविनायक भजनी मंडळ आंबेगाव पठार, ज्ञानेश्वर प्रासादिक भजनी मंडळ बोपगाव, उत्तरेश्वर माऊली भजनी मंडळ उरूळी देवाची.
बाल गट : प्रेमराज भजनी मंडळ दत्त मठ फुरसुंगी, मेघ मल्हार बाल भजनी मंडळ सासवड, माऊली संगीत भजनी मंडळ मिसाळवाडी, संत सोपानकाका भजनी मंडळ सासवड, राजहंस बाल भजनी मंडळ कोडीत.
सासवड (ता. पुरंदर) : येथे स्व. चंदूकाका जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित भव्य भजन स्पर्धेतील विजेत्यांना आनंदीकाकी जगताप आणि मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.