उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज उद्घाटन
उरुळी कांचन : जिल्ह्यातील बहुचर्चित स्वतंत्र उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे उद् घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी (दि. 20) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास होणार आहे.
नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे सुरु करण्याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होत्या. लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे विभाजन करून नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे उभारले जाणार आहे. याबाबत दैनिक प्रभातने वारंवार बातम्यांद्वारे पाठपुरावा केला होता.
राज्य सरकारने नवीन उरुळी कांचन पोलीस ठाणे निर्माण करण्यास डिसेंबर 2021मध्ये मान्यता दिली. या संदर्भातील आदेश 13 डिसेंबर 2021 रोजी गृहविभागाचे तत्कालीन सहसचिव कैलास गायकवाड यांनी काढला होता.
स्वतंत्र पोलीस ठाणे तयार करण्यासाठी 6 कोटी 48 लाख 27 हजार 300 रुपयांच्या खर्चास मान्यताही देण्यात आली आहे. यासाठी शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता.
राज्याच्या मंत्रिमंडळातील ’पॉवर’बाज मंत्री महोदयांना पोलीस ठाण्याच्या उद् घाटनासाठी वेळ मिळत नसल्याच्या कारणामुळे उद् घाटन लांबल्याची चर्चा उरुळी कांचनसह परिसर व खुद्द पोलीस दलात सुरु झाली होती.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे पहिले पोलीस निरीक्षकपद भोर पोलीस ठाण्यातील शंकर मनोहर पाटील पदभार सांभाळणार आहेत; तर त्यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे दोन अधिकारी, 32 पोलीस कर्मचारी मनुष्यबळ मंजूर करून दिले आहे.