श्रीक्षेत्र नारायणपुरात दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा
गराडे – विविध रंगांच्या फुलांची सजावट… विद्युत रोषणाई…फटाक्यांची आतषबाजी… दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा अखंड जयघोषात श्रीक्षेत्र नारायणपूर (ता. पुरंदर) येथे सोमवारी (दि. 25) दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी भाविकांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, जय जय गुरुदेव दत्ता, अत्री अनुसये सुता या जयघोषात दत्तजन्म सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. नारायण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळ उत्साहात पार पडला.
मंदिरामध्ये दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दत्तजयंती सोहळा सायंकाळी 7 वाजून 3 मिनिटांनी पार पडला. श्री दत्तजन्म प्रसंगी पोपट महाराज स्वामी यांचे आख्यान झाले. त्यानंतर पाळणा, पुष्पवृष्टी, देव भेटविणे, सुंठवडा वाटप आदी कार्यक्रम झाले.
याप्रसंगी मध्यप्रदेश, कोलकता, कन्याकुमारी, राजस्थान आदी राज्यांमधून भाविकांनी हजेरी लावली होती.दरम्यान, श्री दत्त मंदिरात सकाळी 9. 30 वाजता आरती दुपारी 1 वाजता विविध गावातून येणार्या दिंड्यांचे स्वागत केले गेले. व भजन त्यानंतर 4 वाजता पादुकावर रुद्राभिषेक करण्यात आला.
या सोहळ्यासाठी पुरंदर-हवीलीचे आमदार संजय जगताप, उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, अधिकारी तानाजी बरडे, तहसीलदार विक्रम राजपूत, पोलीस निरीक्षक संतोष जाधव, आनंद घाडगे, अरुण जाधव, विजय सूर्यवंशी, गणेश मान, सरपंच प्रदीप बोरकर, माजी सरपंच रामभाऊ बोरकर, चंद्रकांत बोरकर, उपसरपंच सुनील क्षीरसागर, ग्रामसेवक रोहित अभंग, एम. के. गायकवाड, तानाजी घारे, बबनराव टकले, साहेबराव भिंतडे आदींसह लाखो भाविक उपस्थित होते. तसेच रात्री 9 वाजता महाप्रसाद व शोभेचे दारुकाम झाले. तर रात्री 10 वाजता किर्तन, 12 वाजता भजनी भारुडाचा कार्यक्रम पार पडला. भरतनाना क्षीरसागर यांच्या आरतीने सर्वभाविक मंत्रमुग्ध झाले होते.