बारामती – येत्या (दि.26) रोजी होणाऱ्या बारामती पॉवर मॅरेथॉनची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. तालुका पातळीवर प्रथमच वर्ल्ड ऍथलेटिक असोसिएशनच्या मान्यतेने आंतरराष्ट्रीय स्थरावरील मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. प्रतिष्ठित कॉम्रेड मॅरेथॉनसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉनसाठी पात्रता निकष म्हणून बारामती पॉवर मॅरेथॉन ग्राह्य धरली जाणार आहे.
42 किमी, 21 किमी, 10 किमी आणि 5 किमी फन रन या कॅटेगरीमध्ये स्पर्धक सहभागी होणार आहेत. रनिंग कॅटेगरी आणि वयोगटानुसार 8 लाखांची बक्षिसे या मॅरेथॉनसाठी निर्धारित केली आहे. मॅरेथॉनचा शुभारंभ पहाटे 4 वाजता व सांगता समारंभ सकाळी 11 वाजता महाराष्ट्र क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, कृषी मंत्री धनंजय मुंडे, बारामती हायटेक टेक्सटाइल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार,
ऑक्सिरीच ब्रॅंडचे प्रमुख पुनीत बालन, अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू शांताराम जाधव आदींच्या उपस्थितीत होणार आहे. ब्रॅंडिंग केले आहे. भव्य स्वागत कमानी, पताका यांनी वातावरण निर्मिती झाली आहे. सदस्यांच्या परिश्रमामुळे मॅरेथॉन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास बारामती स्पोर्टस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्न मॅन सतीश ननवरे यांनी व्यक्त केला आहे.
28 राज्यांतून स्पर्धकांची नोंदणी
आंतरराष्ट्रीय मानकांनुसार होणाऱ्या या मॅरेथॉनसाठी देशभरातील 28 राज्यांतून 2000 हून अधिक धावपट्टूंनी नावनोंदणी केलेली आहे. त्यापैकी प्रामुख्याने अल्ट्रामॅन आयपीएस कृष्णप्रकाश, 5 वेळेस लॉंग डिस्टन्स रनिंगमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड नावे असलेल्या सुफीया खान, डेका मॅन पूर्ण करणारे एकमेव भारतीय रनर प्रशांत हिप्परगी, वयाच्या 65 व्या वर्षी अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे दशरथ जाधव, एनडीए मॅरेथॉन विजेता निशु कुमार यासोबतच देशभरातील दिग्गज धावपट्टू सहभागी होणार आहेत. त्यामुळे क्रीडाप्रेमी बारामतीकरांची उत्कंठा शिगेस पोहोचली आहे.