पवनमावळ (नीलेश ठाकर ) – यंदाचा दीपोत्सव सांगतेकडे चालला असताना आता घरोघरी तुळसी विवाहाचे वेध लागले आहेत. त्यासाठीची तयारी सुरू झाली असून, तुळशी विवाहानिमित्त खास तुळशी वृंदावन खरेदी करण्यासाठी गर्दी वाढत आहे. सध्या काळ्या दगडात घडवलेल्या तुळशी वृंदावनांना सर्वात जास्त मागणी आहे. त्याबरोबरच तुळशी वृंदावनासारख्या दिसणाऱ्या छोट्या कुंड्याही ग्राहकांकडून खरेदी केल्या जात आहेत.
पूर्वी अंगण मोठे असायचे. त्यामुळे दारात बांधकाम करून हव्या त्या पद्धतीने तुळशीचे कट्टे बांधले जात होते. दरवर्षी तुळशी विवाहाच्या आदले दिवशी ते रंगवले जायचे. सध्या फ्लॅट संस्कृतीमुळे तुळशी वृंदावनासाठी पुरेशी जागा मिळत नाही. त्यामुळे तुळशीसाठी कलात्मक केलेल्या कुंड्या कारागीर बनवू लागले आहेत. यामध्येही ज्यांच्याकडे पुरेशी जागा आहे, अशांसाठी काळ्या दगडात घडवलेले तुळशी वृंदावन अधिक प्रमाणात बनवले जाऊ लागले आहेत. अगदी दोन फुटांपासून ते पाच-सहा फूट उंचीएवढे हे वृंदावन आहेत. तीन हजारांपासून किंमत आहे. तसेच, पूर्वी संपूर्ण भरीव तुळशी वृंदावन असायचे. हल्ली तुळशी वृंदावनात पणती किंवा दिवा लावता यावा यासाठी मध्ये रिकामी जागा ठेवली जाते.
ज्यांच्याकडे तुळशी वृंदावनासाठी जागा नाही अशांसाठी विविध रंगांतील छोट्या कुंड्या बाजारात दाखल झाल्या आहेत. चारही बाजूंनी कृष्ण, स्वस्तिक, ओम, गणपती व इतर देवदेवतांचे छायाचित्र लावलेले आहेत. सुमारे पाचशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत याची किंमत आहे. बजेटनुसार तुळशी वृंदावन मिळत असल्याने तयार तुळशी वृंदावन घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे.
आमच्याकडे वधू मिळेल
एकीकडे बाजारात विविध आकारातील तुळशी वृंदावन विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. तर दुसरीकडे तुळशी विवाहाकरिता रोपे खरेदी करण्यासाठी नर्सरीमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. त्यातच शहरातील काही नर्सरी चालकांनी “तुळशी विवाहाकरिता आमच्याकडे वधू मिळेल’, असा फलक लावून नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
ग्रेनाईट, काळ्या दगडात बनवलेल्या तुळशी वृंदावनांना मागणी आहे. हे वृंदावन भरीव नको असतात. मध्ये रिकामी जागा व एका बाजूला एखाद्या देव-देवतांची मूर्ती हवी असते. त्यांच्या मागणीनुसार वृंदावन बनवतो. कुंडीतल्या तुळशी वृंदावनांनाही ग्राहकांची पसंती आहे.
– कन्हैय्या राजपूत, तुळशी वृंदावन व्यावसायिक