लोणंद – धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी गणेश केसकर यांचे लोणंद येथील उपोषण नवव्या दिवशीही सुरुच होते. खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी केसकर यांची भेट घेऊन उपोषण सोडण्याची विनंती केली. “धनगड’ऐवजी धनगर, अशी दुरुस्ती करण्याची मागणी आपण लोकसभेच्या आगामी अधिवेशनात करणार आहेत, असे खासदार पाटील यांनी सांगितले; परंतु आपल्या भूमिकेवर ठाम राहून उपोषण मागे घेण्यास केसकर यांनी नकार दिला.
खासदार पाटील म्हणाले, “धनगड’ऐवजी धनगर, अशी दुरुस्ती करण्याची मागणी लोकसभेमध्ये आमच्या पक्षाच्यावतीने केली जाईल. लोकसभेचे अधिवेशन पुढील महिन्यात होणार आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत, राज्य शासनामार्फत करण्यात येणाऱ्या शिफारशीला लोकसभेत आमच्या पक्षामार्फत पाठिंबा दिला जाईल. लोकसभेत मी किंवा खासदार सुप्रिया सुळे ही भूमिका मांडतील.
धनगडऐवजी धनगर अशी दुरुस्ती करण्याची शिफारस राज्यपालांनी राज्य शासनामार्फत केंद्र शासनाकडे केली पाहिजे, ही मागणी रास्त आहे. यावेळी सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नितीन सावंत, बाजार समितीचे सभापती सुनील शेळके, माजी नगरसेवक हनुमंतराव शेळके, विकास धायगुडे उपस्थित होते.
दरम्यान, आमदार जयकुमार गोरे यांनीही काल (दि. 23) केसकर यांची भेट घेतली. धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मार्ग काढण्याची विनंती करणार आहे. खंडाळा तालुक्यातील धनगर समाजबांधवाच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेन. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, म्हणून एक समाजबांधव म्हणून, धनगर बांधवाच्या खांद्याला खांदा लावून लढाई शेवटपर्यंत लढेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ओबीसी आरक्षण बचाव आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खंडाळा तालुका ओबीसी समाज आणि ओबीसी आरक्षण बचाव संघटनेच्यावतीने काल (दि. 23) लोणंद शहरात भव्य रॅली काढण्यात आली. केसकर यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला. खेड बुद्रुक येथील अरुण पडळकर यांच्या जागरण गोंधळ पार्टीने काल रात्री उपोषणस्थळी गोंधळ घातला. धनगर समाजाचे नेते पाडुरंग मेरगळ यांनीही उपोषणस्थळी उपस्थित राहून केसकर यांना पाठिंबा जाहीर केला.