तीन दिवसांपासून शोधकार्य सुरूच
जुन्नर : रोहकल (चाकण, ता. खेड) येथून जुन्नर तालुक्यातील वडज धरणावर फिरायला आलेल्या 13 पर्यटक तरुणांपैकी एक तरुण वडज धरणात पोहायला गेलेला असताना धरणाच्या खोल पाण्यात बुडुन तो बेपत्ता झालेला आहे. गेल्या तीन दिवसांपासून शोधकार्य सुरू असतानाही तो अद्यापही मिळून आलेला नाही.
सुनील ठोंबरे (वय 36) असे वडज धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव आहे. तो व त्याचे 13 मित्र रोहकल चाकण येथून वडज धरणावर फिरण्याकरिता मंगळवारी (दि. 23) आलेले होते. धरणालगतच्या एका मांसाहारी हॉटेलमध्ये ते सर्वजण थांबलेले असताना सुनील हा हॉटेल मागील धरणाच्या पाण्यात पोहायला गेला होता. यावेळी तो खोल पाण्यात बुडाला. या धरणात पाणीसाठा मोठ्या प्रमाणात असून धरणात गाळाचे प्रमाण अधिक आहे.
ही घटना समजल्यानंतर जुन्नर रेस्क्यू टीमच्या वतीने धरणाच्या पाण्यात शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यानंतर दुसर्या दिवशीही शोधकार्य सुरू ठेवण्यात आले. बुधवारी (दि. 24) पुणे येथील दोन स्कुबाडायव्हर यांना बोलविण्यात आल्यानंतर त्यांनीही खोल पाण्यात शोध घेतला. परंतु त्यांनाही यश आले नाही.
गुरुवारी (दि. 25) जुन्नर रेस्क्यू टीमचे राजकुमार चव्हाण, कपिल कबाडी, आदित्य आचार्य, लखन डाडर, दिनेश पापडे, रुपेश जगताप यांनी पुन्हा शोधकार्य केले. परंतु त्यांनाही यश आले नाही. गेले तीन दिवसांपासून शोधकार्य सुरू असतानाही बुडालेला हा तरुण मिळू शकलेला नाही. वडज धरणात मोठ्या प्रमाणात गाळ तसेच मोठमोठे खड्डे असल्याने यामध्ये तो रुतून बसलेला असल्याची शक्यता आहे. ठोंबरे याचे मित्र, नातेवाइक वडज धरणालगत बसून आहेत.