कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ संघाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार
शिक्रापूर – एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसागर लोटलेला असताना कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून विजयस्तंभाची स्वच्छता करीत परिसर चकाचक करण्यात आला आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरुर) सह पेरणे येथे एक जानेवारी या शौर्यदिनी ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो समाज बांधव आलेले असताना प्रशासनाकडून नागरिकांना सर्व सुविधा देण्यात आलेल्या होत्या. दिवसभरात तब्बल वीस लाखांहून अधिक नागरिकांनी येथे हजेरी लावल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक विजयस्तंभ परिसराची स्वच्छता करण्यात आली.
यावेळी सेवा संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षा दिपिका भालेराव, जमीर शेख, साहिल भालेराव, सचिन भालेराव यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी बोलताना शौर्यदिन कार्यक्रम शांततेत पार पडला असून आता स्वच्छता पूर्ण झाल्याचे समाधान वाटत असल्याचे जिल्हा उपाध्यक्षा दिपिका भालेराव यांनी सांगितले.