फलटण – ‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणार्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित 31 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता. देवगड, जि.सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात शनिवार, दि.6 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास कणकवलीचे आमदार नितेश राणे, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांची प्रमुख उपस्थिती असून संस्थेचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ अध्यक्षस्थानी असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी दिली.
मांडके यांनी सांगितले की, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने पोंभुर्ले-जांभे-देऊळवाडी ग्रामस्थ आणि जांभेकर कुटुंबीय यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय पत्रकार दिनानिमित्त दरवर्षी संस्थेच्या पोंभुर्ले (जि.सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन व राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण केले जाते. यामध्ये ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन गौरव पुरस्कार माधव कदम (सिंधुदुर्ग), राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रशांत कदम (नवी दिल्ली), सागर देशपांडे (पुणे), कैलास म्हापदी (ठाणे), श्रीकांत कात्रे (सातारा), ज्येष्ठ पत्रकार शंकरराव पाटील (कराड) पुरस्कृत राज्यस्तरीय ‘धाडसी पत्रकार’ पुरस्कार-सौ. कृतिका पालव (मुंबई), साहित्यिक गौरव पुरस्कार – डॉ. भगवान अंजनीकर (नांदेड), विशेष ‘दर्पण’ पुरस्कार-शशिकांत सोनवलकर (दुधेबावी, ता.फलटण), विक्रम चोरमले (फलटण) यांचा समावेश आहे.
राज्यातील पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर, माध्यमप्रेमी नागरिक व पोंभुर्ले पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव व कृष्णा शेवडीकर, पोंभुर्ले गावच्या सरपंच सौ. प्रियांका धावडे, उपसरपंच सादिक डोंगरकर यांनी केले आहे.