पुणे – पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अतिक्रमणमुक्त करण्याच्या हालचाली अखेर सुरू झाल्या आहेत. या मार्गाच्या दुतर्फा असलेली अनधिकृत स्टाॅल, अतिक्रमणे व विना परवाना बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावा लागणार आहे. यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सात दिवसांची मुदत दिली आहे.
या महामार्गावर दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे. पर्यायाने वाहतुकीचा वेग मंदावत आहे. तर, वारंवार कोंडीचा प्रश्न उद्भवत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी प्रशासनने वारंवार आढावा घेऊन अखेर कारवाई निश्चित केली आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये रस्तालगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्गच्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे.
त्यामुळे या लांबीदरम्यान केलेली अनधिकृत अतिक्रमणे, बांधकामे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे प्राधिकरणाच्यावतीने यांच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले आहे.