भोर शहरातील घटना ः अग्निशामक दलातील कर्मचार्यांकडून शर्थीचे प्रयत्न
भोर : भोर शहरातील श्रीपतीनगरमधील भरवस्तीत असलेल्या वखारीतीला भुशाला मंगळवारी (दि. 23) पहाटे आग लागली. नगरपालिकेच्या अग्निशामक दलातील कर्मचार्यांनी दाखविलेल्या तत्परेमुळे तासाभरात आग आटोक्यात आली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली.
मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास शहरातील श्रीपतीनगर परिसरातील शंकर भिलारे यांच्या जुन्या वखारीच्या रिकाम्या जागेत ठेवलेल्या लाकडाच्या भुशाला अचानक आग लागली. शेजारी राहणारे भोर तालुका शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुदाम ओंबळे हे लघुशंकेसाठी जागे झाले असता त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. त्यांनी त्वरीत शेजारी राहणा-यांना सतर्क करून नगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख महेंद्र बांदल यांच्याशी संपर्क साधला.
आगीच्या शेजारी असलेल्या रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारी मालकांनी त्वरीत हलविल्या. खबर मिळाल्यानंतर नगरपालिकेच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी आकाश सागळे, ऋषीकेश शेटे, सागर पवार, दत्ता पवार व अमीर शेख हे आगीच्या बंबासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना बाजूला करून तासाभरात आग आटोक्यात आणली. लाकडाच्या भूशाची पोती असल्यामुळे आग विझल्यानंतर काही वेळाने पुन्हा पेट घेत होती.
सकाळी साडेसात वाजेपर्यंत अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी लक्ष ठेवून होते. शेजारी स्थानिक लोकवस्तीसह हॉस्पिटल व लॉज असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अग्निशामक यंत्रणेला येण्यास काही मिनीटे उशीर झाला असता तर आगीमुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असती. त्यामुळे रहिवाश्यांनी नगरपालिकेच्या यंत्रणेला धन्यवाद दिले.